Friday, 8 July 2011

रसिका........


       रसिका गेली.....एक चतुरस्त्र अभिनेत्री, जिनं रुढार्थाने वेगळी वाट चोखाळून फार लहान वयात तिच्या आवडीच्या कार्यक्षेत्रात तिचं असं एक स्थान निर्माण केलं.....ती रसिका........जिनं आजार बळावत चाललेला असतांनादेखील हातात घेतलेली कामं पूर्ण केली, जिनं मराठी रंगभूमीवर मनापासून प्रेम केलं आणि मराठी नाट्यसृष्टीला व्हाईट लिली आणि नाईट रायडर सारखं सर्वार्थानं आजच्या पिढीचं म्हणता येईल असं एक मोकळंढाकळं नाटक देऊन रंगभूमीच्या ऋणातून अंशतः उतराई होण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.....ती रसरशीत व्यक्तिमत्वाची रसिका वयाच्या ३९ व्या वर्षी निघून गेली.
       रसिका आमच्या शाळेची माजी विद्यार्थिनी आणि माझ्यापेक्षा काही वर्षांनीच मोठी असलेली माझी सोसायटीतली मैत्रिण. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, या उक्तिला साजेसं तिचं वागणं-बोलणं तिची बातमी कळल्यापासून आठवतंय......सोसायटीतल्या मंगळागौरींच्या कार्यक्रमात तसंच गणेशोत्सवात तिचं हिरीरीनं भाग घेणं, नावाजलेल्या नाटकांतले प्रवेश सादर करुन स्वतःतल्या अभिनय क्षमतेची  चुणूक दाखवून सर्वांची वाहवा मिळवणं......असं सारं काही आठवतंय. वैयक्तिक आयुष्यातदेखील फार कोवळ्या वयात तिनं तिच्या वयाला न झेपणारी दुःखं नि आघात पचवलेयत् आणि तरीही कायमच जीवनाकडे पहाण्याचा एक चिवट, सकारात्मक दृष्टिकोन बाळगून तिच्या वाट्याला आलेलं आयुष्य ती समरसून जगलीय. बहुतेक talented आणि gifted कलाकार असं शापित आयुष्य का जगतात, असा प्रश्न पडावा असा तिचा मृत्यु खरंच जिवाला चटका लावून गेला.
       मराठी रंगभूमीचं कधीही न भरुन येणारं असं अपरीमित नुकसान झालंय हे जितकं खरं तितकंच एक संवेदनशील माणूस आपण गमावला हेही खरं.        

Wednesday, 22 June 2011

"खुणावती नव्या दिशा" च्या निमित्ताने.........


    डिसेंबर २०१० मध्ये गायत्रीसोबत शालेय क्रीडामहोत्सवाच्या काळात stilt मध्ये एक वेगळा उपक्रम करुन पाहिला होता. शाळेतील विद्यार्थीवर्ग नजरेसमोर ठेऊन निरनिराळ्या व्यावसायिक संधी देणारे अभ्यासक्रम त्यांच्यासमोर प्रदर्शित करण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता आणि त्याला अपेक्षेप्रमाणे प्रतिसाददेखील मिळाला. चुकादेखील झाल्या, मात्र त्यापुढे प्रत्येकवेळी त्या टाळून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला. यातून जसं time management साधता आलं, तसाच आत्मविश्वासदेखील दुणावला. दहावीच्या निकालापूर्वी आणखी एकदा हे प्रदर्शन भरवावं म्हणजे विद्यार्थी जरा गंभीरपणे विचार करतील असं शिक्षकांपासून सर्वांचंच म्हणणे होते. तेव्हा गेल्या शनिवारी पुन्हा एकदा प्रदर्शन मांडलं, मात्र वरुणराजाची अवकृपा झाल्याने निमंत्रित वक्ते येऊ शकले नाहीत आणि लगोलग बुधवारी प्रदर्शन मांडलं. यावेळी मात्र विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. रुपारेल कॉलेजच्या M.C.V.C.-Minimum Competency Vocational Courses विभागाचे अध्यापक श्री.संदेश खोत व श्रीमती संध्या तांबे यांनी मिळून उपस्थितांना प्रस्तुत अभ्यासक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. या अभ्यासक्रमात अंतर्भूत असणारे एकूण सहा प्रमुख गट, त्या गटांतील अभ्यासक्रम चालविणारी मुंबईतील कॉलेजं, त्यानुसार उपलब्ध होणा-या व्यावसायिक संधी यांची उपयुक्त माहिती या निमित्ताने विद्यार्थ्यांना व पालकांना मिळाली. दहावीच्या निकालापूर्वी दोन दिवस अगोदर प्रदर्शन भरवण्याचा फायदा पुढील आयुष्याची दिशा ठरवण्याच्या कामी त्यांना निश्चितच होईल असं वाटतं. आपापली कामं सांभाळून रात्रशाळेत येणारे विद्यार्थी दिवसा भरवलेल्या या प्रदर्शनाला येऊ शकले नाहीत, त्यामुळे त्यांच्याकरीता त्यांना सोयीच्या वेळेनुसार पुन्हा एकदा प्रदर्शन मांडून त्यांच्याशी गप्पा मारल्या. त्यांच्या प्रश्नांतून त्यांच्या गरजा, कठीण परीस्थितीला तोंड देऊन खंबीरपणे आयुष्याला सामोरे जाण्याची त्यांची वास्तववादी वृत्ती असे त्यांचे एक निराळेच भावविश्व उलगडत गेले.

    यानिमित्ताने सुरु झालेल्या या संवादाला एक सकारात्मक वळण मिळेल असं वाटतंय.......            

Saturday, 18 June 2011

निकालानंतर................


     सरतेशेवटी काल दहावीचा निकाल एकदाचा लागला. ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी घराघरांतून, सायबर कॅफेंतून, शाळाशाळांतून सर्वांची एकच झुंबड उडाली. शाळेत एक वेगळीच excitement अनुभवायला मिळाली. शाळेतून पहिलं कोण आलं आणि शाळेचा निकाल किती टक्के लागला याबद्दल शाळेतल्या शिपाईकाकांपासून ते मॅनेजमेंटमधल्या पदाधिका-यांपर्यंत सगळ्यांनाच कमालीची उत्सुकता होती. शाळेचा निकाल ९५% लागला आणि एक खेळाडू विद्यार्थिनी तितकेच गुण मिळवून शाळेतून पहिली आली. अभ्यास आणि खेळ यांची उत्तम सांगड घालून तिने सुयश संपादन केले. दहावीला गेल्यावर निव्वळ अभ्यास एके अभ्यास करुन छंद, मौजमजा, मस्ती या एकूणातच जगणं सुसह्य करणा-या activities ना फाटा देऊन जवळपास सव्वा वर्षं तोच तोच अभ्यास करुन जीवाला त्रास देण्यापेक्षा वर्षभर राष्ट्रीय पातळीवर शाळेतर्फे खेळून शिवाय अभ्यास सांभाळून तिने मिळवलेले यश म्हणूनच उल्लेखनीय आहे. खेळाचे २५ गुण मिळवून तिने यापुढच्या batches समोर एक आदर्श घालून दिलेला आहे. याबद्दल तिचे मनापासून अभिनंदन. यापुढेदेखील तिला अभ्यास सांभाळून खेळायची इच्छा आहे आणि त्यासाठी खेळाला प्राधान्य देणारे मुंबईतले एखादे college निवडायचा तिचा दृढ निर्धार आहे. तिच्या पुढील वाटचालीकरीता तिला आम्हां सर्वांकडून शुभेच्छा.
     दरवर्षीप्रमाणे यंदाही काहींजणांना अगदीच अनपेक्षित तसेच काहींना नकारात्मक निकालाला सामोरे जावे लागले. त्यांना तो तसा लागणे कदाचित अपेक्षित असेलही, मात्र यानिमित्ताने त्यांना स्वतःत डोकावून पाहता येईल. खरंतर paper pattern आणि scheme of marking ची पद्धती समजून घेऊन calculated अभ्यास केला, तरी ५०% गुण मिळवणे अजिबातच कठीण नसते. आता मात्र पूर्वी केलेल्या चुका टाळून त्यांनी जोमाने अभ्यास करावा आणि पुढील शिक्षणाचे दरवाजे त्यांना खुले व्हावेत अशी सदिच्छा आहे. दहावीतील यशापयशावर आयुष्याचे गणित जरी अवलंबून नसले, तरी आपला कल ज्या दिशेला असेल, त्या अभ्यासक्रमाला admission मिळण्यासाठी गुणांचे समीकरण साधावे लागतेच आणि त्यासाठी नियोजनपूर्वक अभ्यास करणे हा एकमेव राजमार्ग आहे. तेव्हा अजूनही वेळ गेलेली नाही, चूक सुधारता येऊ शकते. तसंही अपयशाचा कडू डोस प्रत्येकाला कधी ना कधीतरी प्यावा लागतोच, या निमित्ताने दहावीचा हा टप्पा यशस्वीरीत्या पार पाडणारेदेखील याचा विचार करतील असे वाटते.          

Friday, 3 June 2011

आल इज वेल...................

                दहावीच्या परीक्षेचा निकाल अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपलाय, त्यातून यंदाचा बारावीच्या परीक्षेचा निकाल जेमतेम आदल्या दिवशी बातम्यांमधून सांगून लगेचच दुस-या दिवशी इंटरनेट आणि मोबाइलवरुन कळल्याने एस्.एस्.सी.चे विद्यार्थी गॅसवर आहेत, फेसबुकवर मनातल्या घालमेलीचं स्टेटस अपडेट केलं जातंय, ऑनलाइन फॉर्म भरायचा सराव करण्याकरीता शाळांमधून विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची लगबग सुरु झालेली आहे, समुपदेशकांकडे य़ेणा-यांची गर्दी वाढतेय्, काय काय आणि काय..........एकूणच वातावरणात एक निराळंच चैतन्य अनुभवायला मिळतंय. इतके दिवस ओसाड वाळवंटासारखं वाटणारं शाळेचं आवार पुन्हा एकदा उत्साहाने सळसळायला  लागलंय. येणा-या प्रत्येकाच्या चेह-यावर दडपण आणि उत्सुकता यांचं अनोखं मिश्रण बघायला मिळतंय. अर्थात जवळजवळ सव्वा वर्षं केलेल्या अभ्यासाचं फळ येत्या काही दिवसातच हातात येणार आहे, तेव्हा असं होणं स्वाभाविकच आहे म्हणा....काहीजणांचे निकाल अपेक्षेप्रमाणे लागतील, तर काहीजणांना अनपेक्षितपणे धक्कादायक निकालांना सामोरं जावं लागेल, तर काहीजणांना नकारात्मक निकालाचीच मुळी अपेक्षा असेल.......ते काहीही असलं तरीदेखील दहावीची परीक्षा ही काही आयुष्यातली शेवटची परीक्षा नाही आणि इथून पुढच्या आयुष्यात एक अकरावीचा प्रवेश सोडला, तर दहावीच्या निकालाला फारसं काही महत्व नाही हे माझ्या विद्यार्थी मित्र - मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना मला आवर्जून सांगावसं वाटतं. सध्याच्या काळात शिक्षण क्षेत्रात होणा-या घडामोडींचा आणि खुल्या होणा-या नवनवीन पर्यायांचा विचार करता इथून पुढच्या आयुष्यात उत्तमोत्तम मार्ग आपल्याला उपलब्ध असणार आहेत. तेव्हा निव्वळ भीती आणि नैराश्यापोटी क्षणार्धात होत्याचं नव्हतं करुन टाकणारा कुठलाही आतताय़ी निर्णय घेण्यापेक्षा थोडं थांबून, विचार करुन पाउल उचललं, तर फायदा आपलाच आहे..........आणि तसंही निरनिराळी आव्हानं पेलून आयुष्याला सामोरं जाण्यातच खरी मजा आहे. तेव्हा  होठ घुमा....सीटी बजा....सीटी बजाके बोल........भय्या आल इज वेल....

Tuesday, 31 May 2011

मैत्रबन: मनोगत

मैत्रबन: मनोगत: " शालेय समुपदेशनाचे काम करीत असतांना आलेल्या अनुभवांचा धांडोळा घ्यावासा वाटत होता. या क्षेत्रात सुरु असलेले काम समव्यावसायिक, या..."

मनोगत

              शालेय समुपदेशनाचे काम करीत असतांना आलेल्या अनुभवांचा धांडोळा घ्यावासा वाटत होता. या क्षेत्रात सुरु असलेले काम समव्यावसायिक, या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक मंडळी, मानसशास्त्राचे विद्यार्थी, तसेच शिक्षण क्षेत्राशी संबंधित व्यक्ती, पालक व विद्यार्थी वर्ग यांच्यापर्यंत पोहोचावे असेही वाटत होतेच.' एकमेकां साह्य करु अवघे धरु सुपंथ ' या उक्तीचा प्रत्यय काम करीत असतांना नेहमीच येतो. अशावेळी वैचारीक देवाणघेवाण निकडीची असते, जेणेकरुन  एखाद्या प्रश्नाने उग्र स्वरुप धारण करण्यापूर्वीच त्याचा निकाल लागण्यास मदत होऊ शकते. या व अशा अनेक विचारांनी मनात गर्दी केल्यानंतर ब्लॉगचा विचार डोक्यात आला, त्या दिशेने शोधाशोध केल्यानंतर इंग्रजीत विपुल लेखन केलेले आढळून आले, मात्र मराठीत तुलनेने या विषयावर कमी प्रमाणात, त्यातूनही या स्वरुपात फारच थोडे लिखाण आढळून आले. तेव्हा ब्लॉग स्वरुपातील  लेखनाचा मार्ग स्वीकारावासा वाटला. हा पहिलाच प्रयत्न आहे, मात्र चुकत माकत, निरनिराळ्या वाटा शोधत, वळणावळणाच्या रस्त्यावरुन पुढे जाण्याची तयारी आहे. आपणां सर्वांच्या सूचना स्वागतार्ह आहेत.