Friday, 3 June 2011

आल इज वेल...................

                दहावीच्या परीक्षेचा निकाल अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपलाय, त्यातून यंदाचा बारावीच्या परीक्षेचा निकाल जेमतेम आदल्या दिवशी बातम्यांमधून सांगून लगेचच दुस-या दिवशी इंटरनेट आणि मोबाइलवरुन कळल्याने एस्.एस्.सी.चे विद्यार्थी गॅसवर आहेत, फेसबुकवर मनातल्या घालमेलीचं स्टेटस अपडेट केलं जातंय, ऑनलाइन फॉर्म भरायचा सराव करण्याकरीता शाळांमधून विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची लगबग सुरु झालेली आहे, समुपदेशकांकडे य़ेणा-यांची गर्दी वाढतेय्, काय काय आणि काय..........एकूणच वातावरणात एक निराळंच चैतन्य अनुभवायला मिळतंय. इतके दिवस ओसाड वाळवंटासारखं वाटणारं शाळेचं आवार पुन्हा एकदा उत्साहाने सळसळायला  लागलंय. येणा-या प्रत्येकाच्या चेह-यावर दडपण आणि उत्सुकता यांचं अनोखं मिश्रण बघायला मिळतंय. अर्थात जवळजवळ सव्वा वर्षं केलेल्या अभ्यासाचं फळ येत्या काही दिवसातच हातात येणार आहे, तेव्हा असं होणं स्वाभाविकच आहे म्हणा....काहीजणांचे निकाल अपेक्षेप्रमाणे लागतील, तर काहीजणांना अनपेक्षितपणे धक्कादायक निकालांना सामोरं जावं लागेल, तर काहीजणांना नकारात्मक निकालाचीच मुळी अपेक्षा असेल.......ते काहीही असलं तरीदेखील दहावीची परीक्षा ही काही आयुष्यातली शेवटची परीक्षा नाही आणि इथून पुढच्या आयुष्यात एक अकरावीचा प्रवेश सोडला, तर दहावीच्या निकालाला फारसं काही महत्व नाही हे माझ्या विद्यार्थी मित्र - मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना मला आवर्जून सांगावसं वाटतं. सध्याच्या काळात शिक्षण क्षेत्रात होणा-या घडामोडींचा आणि खुल्या होणा-या नवनवीन पर्यायांचा विचार करता इथून पुढच्या आयुष्यात उत्तमोत्तम मार्ग आपल्याला उपलब्ध असणार आहेत. तेव्हा निव्वळ भीती आणि नैराश्यापोटी क्षणार्धात होत्याचं नव्हतं करुन टाकणारा कुठलाही आतताय़ी निर्णय घेण्यापेक्षा थोडं थांबून, विचार करुन पाउल उचललं, तर फायदा आपलाच आहे..........आणि तसंही निरनिराळी आव्हानं पेलून आयुष्याला सामोरं जाण्यातच खरी मजा आहे. तेव्हा  होठ घुमा....सीटी बजा....सीटी बजाके बोल........भय्या आल इज वेल....

2 comments: