Wednesday, 22 June 2011

"खुणावती नव्या दिशा" च्या निमित्ताने.........


    डिसेंबर २०१० मध्ये गायत्रीसोबत शालेय क्रीडामहोत्सवाच्या काळात stilt मध्ये एक वेगळा उपक्रम करुन पाहिला होता. शाळेतील विद्यार्थीवर्ग नजरेसमोर ठेऊन निरनिराळ्या व्यावसायिक संधी देणारे अभ्यासक्रम त्यांच्यासमोर प्रदर्शित करण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता आणि त्याला अपेक्षेप्रमाणे प्रतिसाददेखील मिळाला. चुकादेखील झाल्या, मात्र त्यापुढे प्रत्येकवेळी त्या टाळून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला. यातून जसं time management साधता आलं, तसाच आत्मविश्वासदेखील दुणावला. दहावीच्या निकालापूर्वी आणखी एकदा हे प्रदर्शन भरवावं म्हणजे विद्यार्थी जरा गंभीरपणे विचार करतील असं शिक्षकांपासून सर्वांचंच म्हणणे होते. तेव्हा गेल्या शनिवारी पुन्हा एकदा प्रदर्शन मांडलं, मात्र वरुणराजाची अवकृपा झाल्याने निमंत्रित वक्ते येऊ शकले नाहीत आणि लगोलग बुधवारी प्रदर्शन मांडलं. यावेळी मात्र विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. रुपारेल कॉलेजच्या M.C.V.C.-Minimum Competency Vocational Courses विभागाचे अध्यापक श्री.संदेश खोत व श्रीमती संध्या तांबे यांनी मिळून उपस्थितांना प्रस्तुत अभ्यासक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. या अभ्यासक्रमात अंतर्भूत असणारे एकूण सहा प्रमुख गट, त्या गटांतील अभ्यासक्रम चालविणारी मुंबईतील कॉलेजं, त्यानुसार उपलब्ध होणा-या व्यावसायिक संधी यांची उपयुक्त माहिती या निमित्ताने विद्यार्थ्यांना व पालकांना मिळाली. दहावीच्या निकालापूर्वी दोन दिवस अगोदर प्रदर्शन भरवण्याचा फायदा पुढील आयुष्याची दिशा ठरवण्याच्या कामी त्यांना निश्चितच होईल असं वाटतं. आपापली कामं सांभाळून रात्रशाळेत येणारे विद्यार्थी दिवसा भरवलेल्या या प्रदर्शनाला येऊ शकले नाहीत, त्यामुळे त्यांच्याकरीता त्यांना सोयीच्या वेळेनुसार पुन्हा एकदा प्रदर्शन मांडून त्यांच्याशी गप्पा मारल्या. त्यांच्या प्रश्नांतून त्यांच्या गरजा, कठीण परीस्थितीला तोंड देऊन खंबीरपणे आयुष्याला सामोरे जाण्याची त्यांची वास्तववादी वृत्ती असे त्यांचे एक निराळेच भावविश्व उलगडत गेले.

    यानिमित्ताने सुरु झालेल्या या संवादाला एक सकारात्मक वळण मिळेल असं वाटतंय.......            

No comments:

Post a Comment