Friday 8 July 2011

रसिका........


       रसिका गेली.....एक चतुरस्त्र अभिनेत्री, जिनं रुढार्थाने वेगळी वाट चोखाळून फार लहान वयात तिच्या आवडीच्या कार्यक्षेत्रात तिचं असं एक स्थान निर्माण केलं.....ती रसिका........जिनं आजार बळावत चाललेला असतांनादेखील हातात घेतलेली कामं पूर्ण केली, जिनं मराठी रंगभूमीवर मनापासून प्रेम केलं आणि मराठी नाट्यसृष्टीला व्हाईट लिली आणि नाईट रायडर सारखं सर्वार्थानं आजच्या पिढीचं म्हणता येईल असं एक मोकळंढाकळं नाटक देऊन रंगभूमीच्या ऋणातून अंशतः उतराई होण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.....ती रसरशीत व्यक्तिमत्वाची रसिका वयाच्या ३९ व्या वर्षी निघून गेली.
       रसिका आमच्या शाळेची माजी विद्यार्थिनी आणि माझ्यापेक्षा काही वर्षांनीच मोठी असलेली माझी सोसायटीतली मैत्रिण. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, या उक्तिला साजेसं तिचं वागणं-बोलणं तिची बातमी कळल्यापासून आठवतंय......सोसायटीतल्या मंगळागौरींच्या कार्यक्रमात तसंच गणेशोत्सवात तिचं हिरीरीनं भाग घेणं, नावाजलेल्या नाटकांतले प्रवेश सादर करुन स्वतःतल्या अभिनय क्षमतेची  चुणूक दाखवून सर्वांची वाहवा मिळवणं......असं सारं काही आठवतंय. वैयक्तिक आयुष्यातदेखील फार कोवळ्या वयात तिनं तिच्या वयाला न झेपणारी दुःखं नि आघात पचवलेयत् आणि तरीही कायमच जीवनाकडे पहाण्याचा एक चिवट, सकारात्मक दृष्टिकोन बाळगून तिच्या वाट्याला आलेलं आयुष्य ती समरसून जगलीय. बहुतेक talented आणि gifted कलाकार असं शापित आयुष्य का जगतात, असा प्रश्न पडावा असा तिचा मृत्यु खरंच जिवाला चटका लावून गेला.
       मराठी रंगभूमीचं कधीही न भरुन येणारं असं अपरीमित नुकसान झालंय हे जितकं खरं तितकंच एक संवेदनशील माणूस आपण गमावला हेही खरं.        

No comments:

Post a Comment